पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी त्यासाठी लागणारा निधी कुठून आणणार याबाबत काहीही निश्चितता नाही. शिवाय, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा करीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यामुळे केवळ दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा शेतकऱ्यांना न्याय देणारी नाही, अशी टीका केंदीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
हेही वाचा -भारत धर्मशाळा आहे का? नागरिकत्व कायद्यावरून राज ठाकरेंचा मोदी सरकारला प्रश्न
शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांचीही कर्जमाफी करावी, अशी मागणी करत वेळप्रसंगी त्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. रामदास आठवले म्हणाले, "काँग्रेस आणि शिवसेनेत सावरकरांवरून मतभेद आहेत. दोन्ही भिन्न विचारधारेचे पक्ष असल्याने त्यांच्यात पुन्हा-पुन्हा मतभेदाचे मुद्दे येत राहतील. त्यामुळे त्यांनी वेगळे व्हायला हवे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र येत सरकार स्थापावे, असे वाटते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे समजत नाही."