पुणे -जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तयार पीक नष्ट झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून राज्य सरकारने एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आठवले आज बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
'राज्य शासनाने शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत द्यावी'
अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी नुकसान पाहणीसाठी दौरे सुरू केले आहेत. रामदास आठवले यांनी आज बारामतीत पाहणी केली.
शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी मी पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे. मात्र, राज्यातील शेतकरी ही राज्य शासनाची प्रथम जबाबदारी असून राज्याने त्यांना तत्काळ मदत द्यावी. खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाबाबतही आठवलेंनी आपली प्रतिक्रिया दिली. खडसे आपल्यासोबत १६ आमदार घेऊन बाहेर पडणार नाहीत. मात्र, खडसेंना पक्ष बदलायचा होता तर, त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यायला पाहिजे होते. मात्र, आता ते राष्ट्रवादीत जात आहेत तर, त्यांना आमच्या शुभेच्छा, असे आठवले म्हणाले.