पुणे - गेल्या काही दिवसांपासून ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर अनेक स्तरातून त्यांना विरोध होत असला तरी पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र त्यांना समर्थन दर्शवण्यात आले आहे. सम तिथीला स्त्रीसंग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असे वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केले होते. त्यानंतर राजकीय क्षेत्रासह नागरिकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून इंदोरीकर महाराजांवर टीका होत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये शिवजयंतीनिमित्त ह.भ.प इंदोरीकर महाराज यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन होते. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करत, उपस्थित नागरिक, वारकरी यांनी बैलगाडीमधून इंदोरीकर महाराज यांची मिरवणूक काढत कीर्तनस्थळी नेले. यावेळी शेकडो नागरिकांची गर्दी पाहून महाराजांनीदेखील सर्वांना नमस्कार केला.
दरम्यान, त्यांना होत असलेला विरोध पाहून काही दिवसांपूर्वी महाराजांनी कीर्तन सोडून शेती करणार असल्याचे उद्वीग्न होत म्हणाले होते. त्यानंतर या वादाला काही तास होत नाहीत की, शिक्षकांची उडवलेल्या खिल्लीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हे सर्व पाहता पिंपरी-चिंचवडमधून ह.भ.प.इंदोरीकर महाराज यांना आज पाठिंबा दर्शवत सोबत असल्याची भावना नागरिकांनी निर्माण करून दिली आहे. परंतु, अजूनही इंदोरीकर महाराज यांच्यावर राजकीय स्तरातून टीका होताना पाहायला मिळत आहे.