ETV Bharat / state
Raksha Bandhan 2023 : ज्ञानेश्वर माऊलींनी भक्ती भावाने अर्पण केली तब्बल २ तोळे सोन्याची राखी, लाडक्या ज्ञानेश्वरांना बहीण मुक्ताईचीही राखी अर्पण
रक्षाबंधना (Raksha Bandhan 2023)दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. तर तापीतीरावरील श्रीक्षेत्र मेहूण येथून आदिशक्ती संत मुक्ताई यांच्याकडून आपल्या तीनही भावंडांना रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला राखी पाठविण्यात आली. श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि श्रीक्षेत्र सासवड अशा तीनही ठिकाणी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राखी पाठविण्यात येवून भावंडांच्या चरणी अर्पण करण्यात आली.
रक्षाबंधन 2023
भक्ताने ज्ञानेश्वर माऊलींना २ तोळे सोन्याची राखी अर्पण केली पुणे (पिंपरी चिंचवड/आळंदी): रक्षाबंधन हा सण (Raksha Bandhan 2023) बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे. संत मुक्ताबाई यांनी आपल्या लाडक्या भाऊ ज्ञानेश्वर माऊलींना राखी पाठवली आहे. तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये आज सकाळी श्री मुक्ताई संस्थान कोथळी मुक्ताईनगर यांच्यातर्फे विश्वस्त पुरुषोत्तम वंजारी यांनी सपत्नीक माऊलींचा अभिषेक करत पूजा करण्यात आली. त्यानंतर मुक्ताई यांच्याकडून आलेली राखी माऊलींच्या चरणी ठेवून पूजा करण्यात आली. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली संस्थेकडून बहीण मुक्ताईला ओवाळणीची भेट म्हणून साडीचोळी भेट देण्यात आली. (Raksha Bandhan Celebration at Muktainagar)
ज्ञानदादाकडून आदिशक्ती मुक्ताबाईस साडीचोळी भेट : संपूर्ण जगाला मानवतावाद देणाऱ्या लहानग्या भगिनीचे बंधूप्रेम आजही जपण्याचे काम श्रीक्षेत्र मेहूण येथील देवस्थानाकडून करण्यात येत आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तापीतीरावरील संत आदिशक्ती मुक्ताई यांच्याकडून, श्रीक्षेत्र आळंदी, त्र्यंबकेश्वर आणि सासवड अशा तिन्ही ठिकाणी राखी पाठविण्यात आली. या तिन्ही ठिकाणी संत मुक्ताईंची राखी भावंडांच्या चरणी अर्पण करण्यात आली. संत मुक्ताबाई संस्थांनच्या वतीने पुरुषोत्तम वंजारी यांनी सपत्नीक माऊलींना पूजा, अभिषेक करुन मुक्ताईची राखी लाडक्या ज्ञानदादाच्या समाधीस भक्तिभावाने अर्पण करण्यात आली. यावेळी आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, हभप सागर महाराज लाहूडकर, संदीप पालवे उपस्थित होते. यावेळी आळंदी देवस्थानच्या वतीने ज्ञानदादाकडून आदिशक्ती मुक्ताबाईस साडीचोळी भेट दिली.
'ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ : आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना मोठे महत्त्व असून, त्यातील एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण-भाऊ यांचे नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बाराव्या शतकात संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि आदिशक्ती संत मुक्ताई. या चारही भावंडांना तत्कालीन समाजाचा अतोनात त्रास सहन करावा लागला होता. अशातही या भावंडांनी जगाचा उद्धार करण्याचं काम केलं. समाजाच्या त्रासाला कंटाळून झोपडीत दार बंद करून बसलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांना लहानग्या मुक्ताईने ताटीचे अभंग रचून विनवणी केली. मोजके व अर्थपूर्ण शब्द आणि प्रत्येक अभंगाच्या शेवटी आग्रहपूर्वक केली जाणारी ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ ही विनवणी होती. यामुळे ज्ञानेश्वर महाराज ताटी उघडून बाहेर येऊन त्यांनी मुक्ताईंच्या डोक्यावर हात फिरवून प्रेमाने कौतुक केलं. त्यानंतर श्रीमद्भगवद्गीतेवर जगत्मान्य असा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला.
मुक्ताई या ज्ञानेश्वर माऊलींच्या बहीण: महाराष्ट्रात अनेक संत महात्म्ये होऊन गेले. या संतांबरोबरच अनेक स्त्री संत समाविष्ट आहेत. ज्यांनी समाजकार्यात बहुमूल्य वाटा उचलला आहे. ज्यांनी मायमराठीच्या सारस्वतात भक्तीचा मळा फुलवला आणि मराठी साहित्याचं दालन भावसंपन्न केलं. ज्यांना असामान्य बुद्धिमत्ता लाभली. ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढल्या, भक्तियोग मार्ग यात पारंगत असलेल्या ज्ञानेश्वरांची बहीण म्हणजेच संत मुक्ताबाई. संत मुक्ताबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे ई.स. १२७९ साली झाला. या महाराष्ट्रातील संत कवयित्री होत्या. संत मुक्ताबाई “मुक्ताई” या नावाने ओळखल्या जातात. रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत हे त्यांचे आई वडील. संत निवृतीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते.
रक्षाबंधनानिमित्त माऊलींना दोन तोळ्यांची सोन्याची राखी: रक्षाबंधनानिमित्त आज आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींना वाघोलीतील गाडे कुटुंबीयांनी दोन तोळ्यापेक्षा जास्त वजनाची सोन्याची राखी अर्पण केली आहे. वारकरी मंडळी हे ज्ञानेश्वर माऊलींना आपला देव, माय, बाप, बहीण, भाऊ असे सर्व काही समजतात. अशा आपल्या बंधू स्वरूप ज्ञानेश्वर माऊली प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाघोली येथील गाडे ह्या वारकरी कुटुंबियांनी सोन्याची राखी ज्ञानेश्वर माऊलीला अर्पण करून, रक्षाबंधन सण साजरा केला आहे. तसेच यंदा पडलेल्या दुष्काळातून राज्यातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा आर्थिक दिलासा मिळू दे आणि शेतकऱ्यांच्या सुख, शांती आणि समृध्दीत भरभरून प्रगती होऊ दे, अशी मागणी देखील गाडे कुटुंबियांनी ज्ञानेश्वर माऊलींकडे केली.
Last Updated : Aug 30, 2023, 5:34 PM IST