बारामती (पुणे) -दिल्लीतील आंदोलन हे खलिस्तान वाद्यांचे, नक्षलवाद्यांचे आहे. या आंदोलनाला पाकिस्तान, चीनचा पाठिंबा आहे. असे म्हणत शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. सीमेवर जे जवान शहीद होतात, त्यातील ६० टक्के जवान हे शेतकर्यांच्या घरातील पोर आहेत. शेतकऱ्यांना देशद्रोही म्हंटल्यावर राग येणार नाही का? वेदना होणार नाहीत का, असा सवाल करून मागील ८० दिवस शेतकऱ्यांना थंडीत कुडकुडत बसायला भाग पाडले. देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांनी येऊ नये म्हणून त्यांच्या वाटेत खिळे ठोकले. तेच खरे देशद्रोही असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
ऊसदरा संदर्भात २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखाना स्थळावर आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी आज इंदापूर न्यायालयात ते हजर झाले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नको असलेले कायदे शेतकऱ्यांवर लादले -
सदरचे आंदोलन हे देशभरातील ८० कोटी शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. मात्र, केंद्र सरकारकडून हे आंदोलन मूठभर शेतकऱ्यांचे व दलालांचे असल्याचे भासवले जात आहे. दिल्लीत सुरू असणाऱ्या आंदोलनात शेतकरी एकच मागणी करत आहेत की, शेतकऱ्यांचा शेतीमालाला हमीभाव मिळावा. यासाठी दिल्लीत शेतकरी एकवटला आहे. शेतमालाला हमी भाव मिळावा. असा सरकारने कायदा करावा. ही आमची मागणी आहे. मात्र, ज्याची आम्ही कधी मागणीच केली नाही. असे तीन कायदे शेतकऱ्यांवर लादले गेले आहेत. याला आमचा विरोध असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.