पुणे- महाविकास आघाडी सरकारमधील विविध नेत्यांवर सध्या मोठ्या प्रमाणावर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे म्हणाले होते की माझ्या मागे ईडी लावली की मी सीडी लावणार. म्हणून मी आता खडसेंच्या सीडीची वाट बघतोय, असे राज ठाकरे म्हणाले. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बांधण्यात आलेल्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
यंत्रणांचा गौरवापर केला जातोय -
केंद्रात काँग्रेसची सत्ता होती, तेव्हाही यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. आत्ता केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही या यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. या यंत्रणा हातातील बाहुली नाही की जो माणूस नको आहे त्याला संपवण्यासाठी या यंत्रणांचा वापर करायचा. हे अत्यंत चुकीची गोष्टी असून ज्यांनी खरंच गुन्हे केलेले आहे. ते मोकाट सुटलेले आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.