पुणे- मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र, शुक्रवार सकाळपासून खेड आंबेगाव, जुन्नर, शिरूर परिसरामध्ये वरुणराजाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून पेरणीच्या कामाला वेग आला आहे.
पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खेड, आंबेगाव, जुन्नरसह शिरूर तालुक्यांत वरुणराजाचे आगमन
मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत होता. मात्र, शुक्रवार सकाळपासून खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर परिसरामध्ये वरुणराजाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी बी बियाणे खरेदी करून पेरणीच्या तयारीला लागला होता. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आता सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले असून पावसाच्या सरी बरसत आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये काही प्रमाणात भात लागवडीची कामे सुरू आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भात खाचरे पाण्याने भरली असून भात लागवडीच्या कामालाही जोर आला आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी शेतकरी मोठ्या उत्साहात भात लागवड करत आहेत.