पुणे -शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि त्या शेतकऱ्याला आज दिल्लीच्या सीमेवर रोखले आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाही. १४ ते १५ बैठकीच्या फेऱ्या झाल्या. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. ऊन, वारा, पाऊस, थंडी सोसत शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र, यावर सरकार बोलायला तयार नाही. एवढेच नव्हे तर, शेतकऱ्यांनी पुढे येऊ नये म्हणून रस्त्यावर खिळे ठोकले जात आहे. सरकारला जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
हेही वाचा -अजित पवार यांच्या हस्ते सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रमाणपत्रांचे वितरण
इंदापूर येथे आज शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, लोकशाहीमध्ये सर्वांनाच मोर्चे, आंदोलने करण्याचा अधिकार आहे. अनेकदा असे आंदोलन पोलिसांना सावरण्यास अडचणी येत असल्यास अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जातात, पाण्याचा मारा केला जातो. मात्र, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर खिळे मारणे, हे सरकारला पटण्यासारखे आहे का?