पुणे- जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळल्याच्या घटनेला आज ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेले संपूर्ण माळीण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या मन हेलावणाऱ्या घटनेने सर्वांचा थरकाप उडाला होता. मात्र, आज या घटनेला पाच वर्ष उलटूनही माळीणकरांच्या आठवणी डोळ्यासमोर ताज्या राहतात. घटनेला आज पाच वर्षे पूर्ण झाल्याने मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पाच वर्षानंतरही ‘माळीण’करांच्या मनात ती घटना आजही घर करुन आहे. या दुर्घटनेत प्रत्येकाने खूप काही गमावलेले आहे. मात्र 'झाले गेले गंगेला मिळाले' म्हणत प्रत्येक माळीणकर मोठ्या हिमतीने नव्या आपल्या आयुष्याची सुरुवात करत आहे. कटू आठवणी विसरून आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी दुर्घटनेतून वाचलेल्या २३ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
काय घडली होती घटना-
माळीण दुर्घटनेनंतर पुन्हा ग्रामस्थांनी घेतली उभारी पावसामुळे कोसळलेल्या डोंगराने संपूर्ण गावालाच ३० जुलै २०१४ रोजी सकाळी गिळंकृत केले. जवळपास १५१ नागरिक या घटनेत मृत्युमुखी पडले. त्यावेळी पडलेल्या प्रचंड पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. अशा बिकट परिस्थितीत स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबविले.
माळीणचे आमडे गावातच पुनर्वसन-
घटनेतून बचावलेल्या ग्रामस्थांच्या संसाराला पुन्हा उभारी देण्यासाठी पुनर्वसन प्रकल्प राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. या प्रकल्पात सुरुवातीला अडचणी आल्या होत्या. ग्रामस्थांच्या सहकार्याने तसेच सामाजिक संस्थांच्या मदतीने प्रशासनाने माळीण शेजारीच आमडे गावात नव्याने माळीण गाव वसवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथील घरे लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत.
पाच वर्षानंतरही त्या दिवशीच्या आठवणी आल्या, की त्यांचे अंग शहारून जाते. त्या दिवशीचा पाऊस, वारा, कोसळलेला डोंगर व मदतकार्यातील आठ दिवस जसेच्या तसे त्यांना आठवतात. याचबरोबर पूर्वीचे छान, सुंदर डोंगराच्या कुशीत वसलेले माळीणगाव, गावातील लोक, घरे, गावात साजरे होणारे सण-उत्सवही त्यांना आठवतात.