पुणे -महासत्ता असलेल्या अमेरिकेतील सत्तांतराचे नाट्य चांगलेच गाजले. काल (बुधवार) जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. तसेच पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी देखील शपथ घेतली. अमेरिकेतील या हाय व्होल्टेज कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा असताना पुणे शहरात लागलेल्या एका पोस्टरने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना खास गावठी शैलीत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
भारती विद्यापीठ परिसरात लागलेले पोस्टर बायडेन 'भाऊ' तर कमला 'अक्का' -
कात्रजच्या भारती विद्यापीठ भागात लागलेले हे भव्य पोस्टर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांना 'भाऊ' तर कमला हॅरीस यांना 'अक्का' असे खास शब्द वापरून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकंदरीतच हा सगळा गमतीशीर प्रकार 'दिल्लीत गोंधळ अन् गल्लीत चर्चा' अशा या प्रकारात मोडणारा आहे.
पार पडला भव्य शपथविधी -
राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या जो बायडेन यांचा शपथविधी सोहळा काल (बुधवारी) कॅपिटोल हिल परिसरात पार पडला. त्यांच्यासोबत भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. बायडेन हे अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष आहेत तर, कमला हॅरीस या देशाच्या पहिल्याच महिला उपराष्ट्राध्यक्षप आहेत.