पुणे -पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात सध्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. यात दुचाकी चोरांचा अधिक भर दिसत आहे, तर जबरी चोरीचे प्रमाणदेखील वाढल्याचे दिसत आहे.
शहरात चोरींचे प्रमाण वाढले
शहरातील वाकड, हिंजवडी, भोसरी, चिखली, परिसरात दुचाकी चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत. यात एकूण जबरी चोरी आणि दुचाकी मिळून १ लाख रुपयांची चोरी एका दिवसात झालेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी हब म्हणून हिंजवडीची ओळख आहे परंतु तिथे अनेक गुन्हे घडत असतात. गणेश बाळासाहेब मस्कर नावाचा व्यक्ती हिंजवडी बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबलेला असताना रिक्षा चालक आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या हातातील दहा हजार रुपयांचा मोबाईल आणि खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना घडली.
भोसरी येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. तर चिखली येथे भरदिवसा एका मुलाच्या गळ्यातील सोन्याचा बदाम हिसकावून चोरट्याने पोबारा केला आहे. हिंजवडी आणि वाकड येथे देखील पार्क केलेल्या दुचाकी चोरांनी लॉक तोडून चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.