महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 19, 2019, 11:22 PM IST

Updated : Jun 20, 2019, 2:01 PM IST

ETV Bharat / state

पुण्यात स्टॅम्प घोटाळा : एकाच कुटुंबातील तिघे गजाआड, 68 लाखाचे स्टॅम्प हस्तगत

वरिष्ठ कोषागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपीक कोषागार करिता शिक्‍का तयार करून स्टॅम्प पेपरवर हा शिक्‍का मारून घोटाळा करण्यात येत होता.

संग्रहित छायाचित्र

पुणे - पोलिसांनी शनिवार वाड्याजवळील लाल महालासमोर असलेल्या कमला कोर्ट या इमारतीमधून तब्बल 68 लाख 38 हजार 170 रुपये किंमतीचे 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर जप्त केले आहेत. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. चिन्मय सुहास देशपांडे (26), सुहास मोरेश्‍वर देशपांडे (59) आणि सुचेता सुहास देशपांडे (54, तिघे रा. 183, कसबा पेठ, पारसनीस वाडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय विश्‍वनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्यात स्टॅम्प घोटाळा : एकाच कुटुंबातील तिघे गजाआड, 68 लाखाचे स्टॅम्प हस्तगत

वरिष्ठ कोषागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपीक कोषागार करिता शिक्‍का तयार करून स्टॅम्प पेपरवर हा शिक्‍का मारून घोटाळा करण्यात येत होता. या प्रकरणानंतर तेलगी मुद्रांक घोटाळ्याची पुन्हा एकदा आठवण झाली आहे. तेलगी मुद्रांक घोटाळ्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट स्टॅम्प सापडल्याचे बोलले जाते.

देशपांडे दाम्पत्य मुलासह कोषागार कार्यालयातून स्टॅम्प काढून नंतर त्यावर बनावट शिक्‍क्‍याचा वापर करून ते स्टॅम्प पेपर ब्लॅकने विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्‍त सुहास बावचे, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल कलगुटकीकर आणि त्यांच्या पथकाने कमला कोर्ट इमारतीमध्ये, देशपांडे यांच्या शनिवार पेठेतील पर्वती माता सोसायटीतील आणि बुधवार पेठेतील देशपांडे व्हेंडरच्या दुकानावर छापा टाकला. तेथून 100 आणि 500 रुपये किंमतीची 68 लाख 38 हजार 170 रुपयांचे स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले आहेत.

देशपांडे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाने आपआपसात संगनमत करून कुठलाही अधिकार नसताना वरिष्ठ कोषागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपीक कोषागार असा शिक्‍का तयार केला होता. कोषागार कार्यालयातून स्टॅम्प पेपर बाहेर काढताना हा शिक्‍का मारला जातो. देशपांडे दाम्पत्य आणि त्यांच्या मुलाने स्टॅम्प पेपरवर हा शिक्‍का मारून स्टॅम्प पेपरची विक्री केली. आरोपींनी एवढ्या मोठ्या रक्‍कमेचे स्टॅम्प पेपर कोठून आणले याबाबत तपास चालू आहे. अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची 21 जून पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

चिन्मय देशपांडे यांचा आजोबांपासून स्टॅम्प विक्रीचा व्यवसाय आहे. मागील 40 वर्षांपासून ते स्टॅम्प विक्री करतात. त्यांच्या आईच्या नावावर स्टॅम्प विक्रीचा परवाना आहे. त्यांनी ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरुन कोरे स्टॅम्प मिळवले होते. त्यावर कोषागार अधिकाऱ्याची सही व शिक्का स्वत: मारला होता. त्यांच्याकडे काही 2017 व 2018 चे स्टॅम्पही सापडले असल्याचे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल कलगुटकर यांनी सांगितले.

Last Updated : Jun 20, 2019, 2:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details