पुणे -ससून रुग्णालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी आजपासून संप पुकारला आहे. सर्व डॉक्टर आजपासून सामूहिक रजेवर गेले आहेत. सातवा वेतन आयोग लागू व्हावा, कोरोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान व्हावा, अस्थायी प्राध्यापकांना नियमित करावे, या मागण्यांसाठी डॉक्टर संपावर गेले आहेत.
सातवा वेतन आयोग लागू करावा आणि कोरोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान करावा, यासाठी डॉक्टर आणि प्राध्यापक हे मागील सहा महिन्यांपासूनप्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहेत. पण त्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आमच्यापैकी बरेच सहाय्यक प्राध्यापक मागील अनेक दिवसांपासून ससून रुग्णालयात रुग्णसेवा करीत आहेत. कोरोना महामारीच्या काळात या डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवेला प्राधान्य दिले आहे. आणि हे डॉक्टर अजूनही अस्थायी स्वरूपामध्ये काम करत आहेत. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार, असे सहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार साळुंखे म्हणाले.