पुणे :आईकडून बाळाला कोरोना झाल्याची पहिलीच घटना आज पुण्यात नोंदवण्यात आली. ससून रुग्णालयात प्रसूती झालेल्या या बाळाला नाळेतूनच कोरोनाची बाधा झाली होती.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या बाळाच्या आईची कोरोनासाठी करण्यात आलेली आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र तरीही तिच्या शरीरात कोरोना विषाणू असल्याचे पुरावे मिळाले होते. अँटीबॉडी टेस्टमध्ये या महिलेच्या शरीरात कोरोनाचे विषाणू असल्याचे दिसून आले.
या बाळाच्या प्रसूतीनंतर त्याच्या नाकातील स्त्राव आणि नाळेतील स्त्राव यांची तपासणी केली असता त्यात कोरोनाचे विषाणू आढळून आले. त्यामुळे आईकडून नाळेमार्फत या बाळाला कोरोनाचे लागण झाल्याचे निष्पन्न झाले. याला व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणतात. अशा प्रकारे कोरोनाचे संक्रमण होणे ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. एचआयव्ही किंवा झिका विषाणूच्या संदर्भात अशा प्रकारचा प्रसार होणे सामान्य बाब आहे.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या बाळाला ताप आणि श्वसनासंबंधी अडचणी होत्या. त्यामुळे कोविड केअर विभागात या बाळावर तीन आठवडे उपचार करण्यात आले. अखेर तीन आठवड्यांनंतर हे बाळ पूर्णपणे बरे झाले. त्यानंतर या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
हेही वाचा :कुर्बानी द्यायची असेल तर आपल्या मुलांची द्या; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य..