महिलांच्या तक्रारी संदर्भात पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया पुणे :शहरात कोयता गँगच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. यानंतर आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. गुन्हेगारांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज तसेच क्लासेसमध्ये महिला सुरक्षेसाठी आता 'तक्रार ड्रॉप बॉक्स' सुरू करणार असल्याचे यावेळी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले आहे.
270 गुंडांना टाकले तुरुंगात :यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, पुण्यात 3 दिवसांपूर्वी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पण याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. तसेच त्याची गंभीर दखल देखील घेण्यात आली आहे. मुलगा आणि मुलगी आहे त्यांचे देखील समुपदेशन सुरू आहे. मागील 6 महिन्यात 31 जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तसेच 14 हजार 400 जणांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. 270 गुंडांना जेलमध्ये टाकण्यात आले. यासह 'एमपीडीए'मध्ये 24 लोकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.
१११ पोलीस चौक्या आता २ शिफ्टमध्ये :भविष्यात देखील गुन्हेगारांवर आळा बसावा यासाठी पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पुण्यातील पोलीस चौकी २४ तास कार्यान्वित करणे तसेच सीसीटीव्ही आणि त्याला मॉनिटर करणे आता सुरू होणार आहे. पुण्यातील १११ पोलीस चौक्या आता २ शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहतील. तसेच कोविड काळात किंवा त्याआधी पुण्यातील ज्या चौक्या बंद होत्या त्या आता सुरू होणार असल्याचे यावेळी रितेश कुमार यांनी सांगितले.
तक्रारदाराची ओळख गुप्त राहील :येणाऱ्या काळात पुण्यातील सर्व शाळा, कॉलेजेस, क्लासेस तसेच शहरातील झोपडपट्टींमध्ये महिला सुरक्षा आणि ड्रगबाबत आता 'तक्रार ड्रॉप बॉक्स' सुरू करण्यात येणार आहे. तसेच जी तक्रार देणारी तरुणी किंवा महिला असेल तिची ओळख गुप्त ठेवण्यात येईल. तक्रार येताच त्याची दखल घेतली जाईल, असे देखील यावेळी रितेश कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा:
- Pune Crime News: पुण्यात दर्शना पवार हत्येची पुनरावृत्ती टळली, एकतर्फी प्रेमातून तरुणीवर केला कोयत्याने हल्ला, पहा सीसीटिव्ही
- Pune Student attack: विद्यार्थिनीवरील हल्ल्यानंतर तीन पोलीस कर्मचारी निलंबित, 'ती' मोठी चूक भोवली!
- Darshana Pawar Murder Case: ... तर दर्शना पवारसारख्या घटना होणार नाहीत; एमपीएससी उमेदवारांच्या भावना