पुणे- अयोध्येत आज राम मंदिर भूमिपूजन सोहोळा पार पडणार आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने तब्बल १० लाख मोतीचूर लाडूंचे वाटप करण्यात येणार होते. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांना लाडू वाटपाचा कार्यक्रम करू नये, असे एका नोटीस द्वारे कळवले आहे.
अत्यंत भक्तीमय वातावरणात आज राम मंदिर भूमिपूजन सोहोळ्याचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या सोहोळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थितीत लाभणार असून त्यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्यावतीने हा उत्सव साजरा करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४० प्रमुख चौकात लाडू वाटप करण्यात येणार होते. त्यानुसार इंद्रायणीनगर येथील एका मोठ्या हॉलमध्ये दोन दिवसांपासून लाडू तयार करण्याची लगबग सुरू आहे.