पुणे :पुण्यामध्ये अवैध धंदे, गुन्हेगारीचा वाढता आलेख दिवसेंदिवस पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुणे पोलिस सतर्क झाले आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून नाकाबंदी देखील केली जात आहे. सोमवारी रात्री वाहतूक शाखा, लोणिकाळभोर पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा युनिट 5 नाका बंदी करत होते. तेव्हा त्यांना एका संशयित ब्रिजा कार एमएच 13 सीके 2111 आढळली. त्यांनी हे वाहन ताब्यात घेतले. संशयित इसमास हडपसर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यानंतर दोन पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. वाहनात बॅगा मिळून आल्या. बॅगा तपासून पाहिल्या असता, त्यामध्ये एकूण 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपये मिळून आले आहे.
Pune Crime News: पुणे पोलिसांची मोठी कारवाई: संशयित वाहन चालकाकडून 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपये जप्त
पुणे पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी करत होते. तेव्हा त्यांनी एका वाहन चालकाकडून पुणे पोलिसांनी 3 कोटी 42 लाख 66 हजार 220 रुपये जप्त केले आहे. पुढील तपास सुरू आहे.
रोख रक्कम पंचासमक्ष जप्त करून सीलबंद : या प्रकरणी चालक प्रशांत धनपाल गांधी याची चौकशी करण्यात आली. त्याचे वय 47 वर्षे आहे. तो व्यवसाय खत व्यवसाय, दूध व्यवसाय, किराणा दुकान व शेती व्यवसाय करतो. तो पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लासूरणे येथील रहिवासी आहे. त्याच्याकडील वाहन जप्त करण्यात आले आहे. ही रोख रक्कम मोजून दोन पंचासमक्ष जप्त करून सीलबंद करण्यात आली आहे.
कर्जाची रक्कम :याबाबत सीआरपीसी कलम 41(D) अन्वये हडपसर पोलीस ठाणे येथे कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभाग, पुणे यांना पुढील कारवाई करण्याबाबत कळविण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी गांधी याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना ही रक्कम त्याच्या राहत्या घरातून पुणे येथील महाराष्ट्र बँक मुख्य शाखा, लक्ष्मीरोड येथे कर्जापोटी रक्कम भरायची होती, असे सांगितले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.