पुणे :पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भेट घेऊन तक्रार केली होती. याप्रकरणी आता शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम - 80/23 कायदा 420, 406, 465, 467, 468, 471, 511, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. डॉ हेमंत रामशरण गुप्ता, शिवसेना नेते संजय राऊत यांचे सहकारी सुजित मुकुंद पाटकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला कोरोनाच्या काळात पुण्यातील जंबो कोविड सेंटरचे व्यवस्थापन करण्याचे कंत्राट देण्यात आले होते.
फसवणुकीद्वारे कंत्राट :त्यानंतर वैद्यकीय सेवांसाठी निविदा प्रक्रियेत निवड करताना बनावट भागीदारी करारनामा तयार करून निविदा मंजूर केल्याचा प्रकार समोर आला होता. यावरुन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले की, संजय राऊत यांचे भागीदार सुजित पाटकर आणि त्यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी हा कंत्राट फसवणुकीद्वारे मिळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यो कोविड सेंटरमुळे 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिकांचे नुकसान झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.