पुणे -ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५० च्या पुढे आहे आणि ज्या महिला कर्मचाऱ्यांच्या घरी लहान मुलं आहेत, अशा कर्मचाऱ्यांना 'फील्ड ड्युटी' न देण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतलाय. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती जवळ आली असेल, ज्या कर्मचाऱ्यांना काही आजार आहेत अशा कर्मचाऱ्यांना अधिकची रजा दिली आहे.
पन्नाशीवरील कर्मचाऱ्यांना 'फील्ड ड्युटी' नाही, पुणे पोलिसांचा निर्णय
पन्नाशीच्या पुढील, सेवानिवृत्ती जवळ आलेल्या, लहान मुले असलेल्या महिला पोलिसांना आणि कोणतीही आजारपणाची लक्षणे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना 'फील्ड ड्युटी' न लावण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. तसेच, पोलिसांसाठी काही कोरोना रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवल्या आहेत. कोरोनाबााधित पोलिसांना दहा हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. या पोलिसांना आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये बिनव्याजी दिले जातील.
पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत रोज दक्षता घेतली जात आहे. त्यांना कुठलीही आजारपणाची लक्षणे आढळून आल्यास त्यांचे स्क्रिनिंग केले जात आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.
याशिवाय कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये अद्ययावत वॉर्ड राखीव ठेवण्यात आलाय. ५० बेडचा हा वॉर्ड पोलिसांसाठी राखीव ठेवला आहे. त्याचबरोबर दीनानाथ आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्येही बेड राखीव ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे या दोन हॉस्पिटलमध्येही आम्हाला काही बेड राखीव मिळणार असल्याचे शिसवे यांनी सांगितले.
पुण्यात सध्या आठ पोलीस कोरोनाबाधित आहेत. या पोलिसांना दहा हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. हे बक्षीस पोलीस कल्याण निधीतून त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. तर आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये बिनव्याजी संबंधित पोलिसांना दिले जाणार असल्याचेही शिसवे यांनी सांगितले.