पुणे- शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी काल रात्री चार तास 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवून सराईत गुन्हेगारांची 'कुंडली' तपासली. त्यामध्ये तब्बल १ हजार १७४ गुन्हेगार मिळून आले आहेत. 'आर्म अॅक्ट'नुसार पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून दोन गावठी पिस्तूल, ९ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्याशिवाय शहरभरात विविध पोलीस ठाण्यातंर्गत २५० आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४० कोयते, ५ तलवारी, १ कुकरी, २ पालघन, १ सुरा असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शहरांतर्गत गुन्हेगारांची झाडाझाडती घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी काल रात्री नऊ ते एक वाजेपर्यंत 'कोम्बिंग ऑपरेशन' राबविले. एकाचवेळी करण्यात आलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांची पळता भुई थोडी झाली. गुन्हे शाखेच्या पाच पथकातील अधिका-यांसह कर्मचा-यांनी ठिकठिकाणी शोध मोहीम राबवून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, गुन्हे शाखेच्या परिमंडळ एक ते पाच पथके, प्रत्येक पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २८ परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक यांनी केली आहे. गुन्हे शाखेची दमदार कामगिरी
पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने दमदार कामगिरी केली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने आर्मअॅक्टनुसार १४२ गुन्हेगारांची माहिती तपासली आहे. त्याशिवाय विविध टोळीतील ३२८ गुन्हेगारांना तपासले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने 'पिटा अॅक्ट'नुसार १५ जणांना तपासले आहे. दरोडा वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने ४९ वाहनचोर तपासले असता, त्यामध्ये १० गुन्हेगार मिळून आले. जबरी चोरीतील २ गुन्हेगार मिळून आले. शरिराविरूद्धच्या गुन्ह्यात ६ गुन्हेगार मिळून आले आहेत. त्याशिवाय बिबवेवाडीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
तडीपार असतानाही शहरात वास्तव्य भोवले
तडीपार काळातही शहरात आलेल्या ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये ६ गुन्हे दाखल केले आहेत. शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या २१ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. सीआरपीसी १५१ (१)कलमानुसार १६२ गुन्हेगारांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांसह गुन्हे शाखेकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामुळे शस्त्रसाठ्यासह गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार करण्यात येत आहेत.