पुणे -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करुनही पुणेकर अजूनही गंभीर दिसत नाहीत. पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली म्हणजे कोरोना संपला, असे अजूनही मोठ्याप्रमाणात पुणेकरांना वाटत आहे. पुण्यातील बाजारपेठांमध्ये बहुतांश दुकानदार आणि ग्राहक मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत नाहीत, असे चित्र आहे.
पुणेकर झाले निवांत; बाजारात मास्क न वापरण्यासह सोशल डिस्टन्सिगंचा फज्जा - पुणे कोरोना बातमी
पुण्यातील बाजारपेठांमध्ये बहुतांश दुकानदार आणि ग्राहक मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत नाहीत, असे चित्र आहे.
देशात कोरोनाच्या बाबतीत पुणे शहर हे प्रमुख शहरांपैकी एक. एकेकाळी सर्वाधिक हॉटस्पॉट म्हणून ओळखले जाणारे शहर पुणे होते. तब्बल 7 महिन्यांनंतर आता कुठेतरी पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोना संपलेला नाही. हे वारंवार पुणेकरांना आठवून द्यावे लागते आहे. एकीकडे प्रशासन कोरोनाचा मुकाबला करत असताना पुण्याची परिस्थिती कशी सुधारता येईल यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या ठिकाणी मात्र कोरोनाच्या बाबतीत पुणेकर निवांत झाले आहेत असे सध्या तरी दिसत आहे.
पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा फुले मंडईत मोठ्या संख्येने नागरिक हे विना मास्क फिरत आहेत. काही दुकानदारही विना मास्क विक्री करत आहेत. काहींना भीती आहे तर काही निवांत भीती नसल्यासारखे फिरत आहेत. मंडईत मोठ्या संख्येने येणारे ग्राहक हे विना मास्क लावून फिरत आहेत. आम्ही तर विना मास्क ग्राहकाला खरेदीही करू देत नाही तरीही लोक निवांत असल्यासारखे वागत आहेत. बाहेरून आलेल्या लोकांमध्ये कोरोनाबाबत भीती दिसते पण काही पुणेकरांच्याबाबतीत मात्र अजूनही कोरोनाबाबत गांभीर्य दिसत नाही, अशी माहिती येथील दुकानदारांनी यावेळी दिली.