पुणे Car Racing Championship : आजच्या युगात महिला कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाहीत. घर असो किंवा कामाची जागा, आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. असं कोणतंही क्षेत्र नाही जिथं महिलांचं योगदान नाही. सर्वच क्षेत्रात महिला आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. असं म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण पुण्यातल्या निकिता टकलेच्याबाबत (Nikita Takle) उलट घडलंय. तिचे वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचं दिसतं. 23 वर्षीय निकिता ही कार रेसिंगमध्ये पहिली महिला चॅम्पियन ठरली (Woman Champion In Car Racing) आहे. त्यासाठी वडिलांचं मार्गदर्श तिला लाभलं. वडील नितीन टकले यांनी निकिताला अक्षरशः घडवलं. तसंच कायमच तिला खेळात प्रोत्साहन दिलं.
विविध खेळात सहभागी :पुण्यातील शेवाळवाडी जवळ असलेल्या टकले नगर येथे राहणाऱ्या, नितीन टकले यांची एकुलती एक मुलगी निकिता. लहानपणापासूनच ती विविध खेळात भाग घेत होती. वडील नितीन टकले यांनी सर्वसाधारण मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला नाही. तिच्यात नेहमीच स्पेशल शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एखादा असा खेळ ज्याच्यात निकितानंही स्वतःला सिद्ध करावं, त्यामध्ये तिनं करिअर करावं असं त्यांना वाटायचं. पण निकिता तर लहानपणापासून मिळेल त्या खेळात सहभागी होत होती.
असा घडला प्रवास : आईची इच्छा होती मुलीनं कराटेमध्ये करिअर करावं तर वडिलांचं इच्छा होती की तिनं एखाद्या वेगळ्या स्पोर्ट्समध्ये जावं. खराडी येथे कार रेसिंग स्पर्धेचं निमंत्रण वडिलांना मिळालं होतं. स्पर्धा बघायला वडील निकिताला घेऊन गेले होते. तिथं स्पर्धेत सहज भाग घ्यायला वडिलांनी निकिताला सांगितलं. त्या स्पर्धेत तिला एक दोन नव्हे तर जवळपास 9 ट्रॉफी मिळाल्या. वडिलांना तेव्हाच वाटलं की, आपल्या मुलीनं या क्षेत्रात करिअर करावं. वडिलांनी सांगितलं म्हणून निकितानंही लगेच होकार दिला. बेंगलोरला जाऊन गुरू चेतन शिवराम यांच्या हाताखाली कार रेसिंगचं निकितानं प्रशिक्षण घेतलं. आज पाहता-पाहता दोन वर्षातच ती देशातील पहिली चॅम्पियन रेसर म्हणून समोर आली आहे.