पुणे -पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर महापालिकेने आपली 20 रुग्णालये आणि सर्व 74 ओपीडी चालू केले आहेत. दररोज किमान 3 हजार 500 ते 4 हजार रुग्ण विविध आजारांवर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमधून औषध उपचार घेत आहेत.
माहिती देताना सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि कमला नेहरू रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कोरोनाच्या सुरवातीच्या काळात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण घाबरत होते. मात्र, आता जसजशी शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे, तसतसे अन्य आजारांच्या रुग्णांची संख्या रुग्णालयात वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे महापालिकेचे मध्यंतरी 35 ओपीडी बंद होते. त्यामुळे, अन्य आजाराच्या रुग्णांना उपचारासाठी अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता महापालिकेने सर्व रुग्णालये व ओपीडी सुरू केल्याने दिवसेंदिवस अन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
रुग्णालयात येणाऱ्या प्रात्येकाचे सॅनिटायझेशन
महापालिकेची सर्व रुग्णालये आणि ओपीडी सुरू झाल्याने रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर महापालिकेच्यावतीने सर्वच रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे रुग्णालयात दाखल होताना थर्मामिटरने चेकिंग आणि सॅनिटायझेशन होत आहे. एखाद्या व्यक्तीबाबत काही शंका आल्यास त्याला बाहेरील ओपीडीत दाखवण्याचा सल्ला सुरक्षारक्षकाकडून दिला जातो. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.
स्वच्छता, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगवर भर
पुणे महापालिकेची सर्व 20 रुग्णालये आणि 74 ओपीडीमध्ये वेळोवेळी स्वच्छता, रुग्णालयातील ओपीडी सॅनिटायझेशन करून घेणे, आणि रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना ओपीडीत सोशल डिस्टन्सिंगमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, डॉक्टरही सर्व नियमांचे पालन करीत सोशल डिस्टन्सिंग ठेवत रुग्णांची तपासणी करत आहेत.
मास्क नसेल तर रुग्णालयात प्रवेश नाही
कोरोनाची रुग्णसंख्या जसजशी कमी होत आहे तसतसे नॉन कोविड रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. एखाद्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या हजारोंना त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. मास्क शिवाय रुग्णालयात कोणालाही आत सोडण्यात येत नाही. महापालिकेच्या सर्व रुग्णालयात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अशी माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी दिली.
कमलानेहरू रुग्णालयात दरोरोज 600 ते 700 रुग्ण घेतात उपचार
पुणे शहरात मध्यभागी असलेले कमलानेहरू रुग्णालय हे पुणे महापालिकेचे सर्वात मोठे रुग्णालय असून इतर रुग्णांना उपचार घेता यावा यासाठी कोरोनाच्या सुरवातीपासूनच हे रुग्णालय नॉन कोविड रुग्णालय ठेवण्यात आले होते. कोरोनाच्या सुरुवातीला येथे 100 ते 150 रुग्ण उपचारासाठी येत होते, मात्र त्यानंतर जसजसे पुणे शहरात कोरोना रुग्ण कमी होत गेले, तसतसे कमलानेहरू रुग्णालयात रुग्णांची उपचारासाठी गर्दी वाढू लागली आहे. या रुग्णालयात दररोज ६०० ते ७०० रुग्ण उपचार घेत आहेत.
रुग्णांच्या नातेवाईकांना अजूनही भीती नाही
कमलानेहरू रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला चेकिंग करूनच रुग्णालयात सोडले जात आहे. मात्र, रुग्णांच्या नातेवाईकांच्या मनातून जणू कोरोनाची भीती गायब झाल्याचे दिसून येत आहे. नातेवाईक रुग्णालयाबाहेर विना मास्क, विना सोशल डिस्टन्सिंग सर्रास एकमेकांशी चर्चा करत बसतात. कोरोनाच्या सुरवातीला नागरिकांमध्ये भीती होती, मात्र रुग्णसंख्या जसजशी कमी होत गेली, तसतसे नागरिकही निवांत झाले आहेत. अनेक वेळा सुरक्षारक्षकाकडून सांगूनही नागरिक सुरक्षारक्षकालाच दमदाटी करतात. कोरोनाच्या या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करायला हवे, असे आवाहन कमलानेहरू रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लता त्रिंबके यांनी केले.
दरोरोज 250 ते 300 महिलांची प्रसुती पूर्व तपासणी
कमलानेहरू रुग्णालय शहराच्या मध्यभागी असल्याने या ठिकाणी महिलांची प्रसुतीपूर्व तपासणी व प्रसुती मोठ्या प्रमाणात होत असते. दररोज साधारणत: अडीचशे ते तीनशे महिलांची प्रसुतीपूर्व तपासणी केली जाते. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत 3 हजार 248 महिलांची प्रसूती करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. त्रिंबके यांनी दिली. या महिलांची तपासणी करताना योग्य ती खबरदारी घेतली जाते.
साथीच्या आजारात वाढ
वातावरणात झालेल्या बदलामुळे साथीच्या आजारात वाढ झाली आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, उत्साह नसल्यासारखे वाटणे, डोके दुखणे, असे अनेक आजार शहरात वाढले आहेत. अचानक वाढलेली उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. त्यामुळे, शहरातील विविध रुग्णालयात रुग्ण वाढले आहेत. रुग्णालयात आलेल्या रुग्णांची योग्य तपासणी केली जात आहे. सर्दी, ताप, खोकला जास्त असलेल्या रुग्णांची नोंद केली जात आहे आणि त्यावर विशेष लक्षही दिले जात आहे.
हेही वाचा -अपघातातील जखमी व्यक्तीला मदतीच्या बहाण्याने लुटले; तिघांना पोलीस कोठडी