पुणे :दिवसेंदिवस बनावट प्रमाणपत्रांचा वापर हा वाढतच चालला आहे. महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरतीमध्ये अनुभवाचे खोटे पुरावे सादर करून नोकरी मिळविलेल्या तीन कनिष्ठ अभियंत्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने मागच्या वर्षी जी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात बोगस प्रमाणपत्र देण्याबाबत तक्रारी आल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तीन अधिकार्यांची चौकशी समिती नेमली होती.
कनिष्ठ अभियंत्यांच्या जागांची भरती :कनिष्ठ अभियंता म्हणून भरती झालेल्या 50 जणांची कागदपत्रे तपासण्यात आली आणि चौकशी समितीच्या अहवालानुसार तीन कनिष्ठ अभियंत्यांनी अनुभवाचे बनावट दाखले जोडल्याचे आढळले. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून मागच्या वर्षी 448 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यामध्ये कनिष्ठ अभियंत्यांच्या 142 जागांची भरती करण्यात आली.
बनावट कागदपत्र दिली असल्याचा आरोप :तीन वर्षांचा अनुभवाचा पुरावा म्हणून फॉर्म 16, बँक स्टेटमेंट, पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र, पीएफ क्रमांक यांसह 11 प्रकारची कागदपत्रे आवश्यक होती. कनिष्ठ अभियंता पदाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या काही उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रात पे स्लीप, अनुभव प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्र बनावट दिली असल्याचा आरोप झाला होता.
बोगस विद्यापीठ :लॉकडाऊनच्या काळात छत्रपती संभाजी नगर येथे राहणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाने चक्क यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बोगस विद्यापीठ सुरू केले होते. त्याने या विद्यापीठाच्या माध्यमातून दहावी, बारावीचे सर्टिफिकेट तसेच विविध डिग्री देऊन 2700 हून अधिक तरुणांना फसवले होते. मे महिन्यात या तरुणाला आणि त्याच्या दोन साथीदारांना पुणे गुन्हे शाखेने अटक केली होती. यातील मुख्य आरोपीचे नाव इब्राहिम सय्यद असे होते.
हेही वाचा :
- Bogus Degree Certificate Scam: उच्चशिक्षित तरुणाने यूट्यूबवर बघून सुरू केले 'बोगस विद्यापीठ'; 2700 हून जास्त डिग्रींचे वाटप
- Fake Doctors: गरोदर मातांचा मृत्यू; तीन बोगस महिला डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
- Mumbai Crime News : लिवाईस कंपनीच्या बोगस कपड्यांची विक्री; मुंबईतून तिघांना अटक