पुणे - राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज (गुरुवार) पहाटेपासूनच धुक्याची दाट चादर पसरली होती. यामुळे द्रुतगतीमार्ग काही वेळ मंदावला होता. गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे. अशा वेळेस द्रुतगती मार्गावर पसरलेले धुके वाहन चालकांना आणि प्रवाशांना सुखावणारे आहे. काहींनी आपली वाहने थांबवून या धुक्याचा आनंद घेतला.
पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसराला आज पहाटे धुक्याने वेढले होते. परिणामी पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग धुक्यात हरवला होता. धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली. दिवस उजाडूनही धुक्याची चादर कमी होत नसल्यामुळे अनेकांनी पुढे जाण्यासाठी वाहनांच्या हेडलाईट लावल्या होत्या. मात्र, हेडलाईट देखील धुक्यापुढे निकामी ठरत होते.