पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार ( Dy CM Ajit Pawar ) यांच्या अध्यक्षतेखाली नीरा उजवा/डावा कालवा, खडकवासला, भामा आसखेड प्रकल्प उन्हाळी हंगाम सन २०२२ कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ( Kalva Samiti Meeting Pune ) या बैठकीतून खासदार गिरीश बापट यांनी सभात्याग केला. येत्या 2 ते 3 दिवसात जर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला तर माझ्या नेतृत्वाखाली आंदोलन करू, असा इशारा यावेळी खासदार गिरीश बापट यांनी दिला. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,खासदार गिरीश बापट तसेच अधिकारी उपस्थित होते.
बापट यांची टीका - उन्हाळ्यामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. पण शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये असमान पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. समान पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही आहे. गरिबाला वेगळा न्याय आणि श्रीमंताला वेगळा न्याय दिला जात आहे, अशी टीका यावेळी बापट यांनी केली.