पुणे - काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध महापालिका प्रशासनाने पावसाळीपूर्व कामांचे नियोजन सुरू केले आहे. शहरात पाणी तुंबू नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी नाले, ओढे, गटारे, पावसाळी लाईन, चेंबर दुरुस्ती आदी कामे एप्रिल-मे महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार येत्या १०-१२ दिवसांत ही सर्व कामे पूर्ण होतील, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले, याचा ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा....
ठाणे पालिकेने दिल्या विकासकांना नोटिसा, नालेसफाई वेळेवर अन्यथा ठाण्यात पूर परिस्थिती
अवघ्या काही दिवसांवर पावसाळा आला आहे. अशा स्थितीत शहरातील नाल्यांची सफाई करणे गरजेचे आहे. ठाणे शहर जसे तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे तसेच नाल्यांचे शहर म्हणूनही त्याची ख्याती आहे. शहरात जवळपास 150 किलोमीटरचे लहान-मोठे नाले असून दरवर्षी अनेक नाले स्वच्छ न झाल्याने लोकवस्त्यांध्ये पाणी भरते आणि अनेकांचे संसार पाण्याखाली जातात. त्यामुळे पालिकेने नालेसफाई करण्यासाठी संबंधित विकासकांना नोटीसा दिल्या आहेत.
ठाण्यातील प्रमुख नाला उपवन येथून सुरु होऊन शहराच्या विविध भागातून वाहत खाडीला जाऊन मिळतो. सदरचा नाला शहरातील 30 ते 40 टक्के घाण पाणी वाहून नेण्याचे काम करतो. या नाल्याची वेळीच सफाई झाली नाही, तर अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान होऊ शकते, असा दावा ज्येष्ठ शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी केला आहे. त्यांच्या प्रभागात रुस्तमजी बिल्डर यांनी या प्रचंड मोठ्या नाल्याला अनेक ठिकाणी वळविले आहे. बऱ्याच ठिकाणी त्याची रुंदी देखील कमी केली आहे. तर बऱ्याच ठिकाणी नाला बंद केल्याची तक्रार तरे यांनी पालिकेकडे केल्याचे सांगितले. नालेसफाई वेळेवर करण्यासाठी संबंधीत विकासकांना नोटिसा दिल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
पुण्यात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणार
पुणे शहरात एकूण ६५० किलोमीटर लांबीच्या पावसाळी लाइन (गटारे) असून त्यावर जवळपास ३६ हजार ३९५ चेंबर्स आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर ४४५ कलवर्ट (पाणी जाणारी मोरी) आहेत. तर ३६२ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पावसाळ्यापूर्वीच्या कामांबाबत अधिक माहिती देताना पुणे महापालिका ड्रेनेज विभागाचे अधिकारी प्रवीण गेडाम म्हणाले, मागील वर्षी ढगफुटी झाल्याने, आंबिल ओढ्याला पूर येऊन जीवितहानीसह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदा महापालिका प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेऊन कामे लवकर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
पुणे महानगरपालिकेने पावसाळ्यापुर्वीच्या कामांना सुरूवात केली आहे.... सध्या मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. असे असले तरी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळापूर्व कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने ही कामे हाती घेतली असून आत्तापर्यंत आंबिल ओढ्यासह इतर ओढ्यांमधील राडारोडा काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास एक हजार ट्रक राडारोडा ओढ्यातून बाहेर काढल्याचा दावा गेडाम यांनी केला आहे. या कामासाठी जेसीबी आणि पोकलेन मशिन्स, टिपर आदींचा वापर करण्यात येत आहे. नाल्यातील राडारोडा काढून अनेक ठिकाणी ओढ्याचे पात्र रुंद करण्यात आल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार असल्याचे सांगत सर्व काम महिनाअखेर पूर्ण होईल, असा विश्वास गेडाम यांनी व्यक्त केला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील वर्षी अचानक आलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अनुभव पाहता यावर्षी पावसाळापूर्व कामे लवकर सुरू केली. शहरातील आंबील ओढ्यातील कामे पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. या आंबिल ओढा रुंदीकरण, खोलीकरण, कलव्हर्ट बंधने, ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला जाऊ शकतो, अशी सर्व ठिकाणे मोकळी करण्यात आली आहेत. याशिवाय शहरात ज्या ठिकाणी पाणी साचण्याचा धोका आहे, अशा सर्व जागांवर कामे सुरू असून ती लवकरात लवकर पूर्ण होतील. मागील वर्षी निर्माण झालेली परिस्थिती यावर्षी उद्भवणार नाही.
माजी नगरसेवक असलेल्या धनंजय जाधव यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. मागील वर्षी आलेल्या पूरपरिस्थितीचा फटका हजारो लोकांना बसला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यातून अजूनही ते पूर्णपणे सावरले नाहीत. या भागात कामे करण्यासाठी महापालिकेने 25 ते 30 कोटीचे बजेट ठेवले. परंतु या भागात कामे अद्याप सुरू झाली नाहीत. केवळ देखावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी वाहून आलेल्या गाड्या, राडारोडा अजूनही आहे त्याच ठिकाणी पडून आहे. या भागात सीमाभिंत न बांधल्यामुळे अजूनही हजारो लोकांचे जीव धोक्यात आहे.
हेही वाचा -कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील मशरूम उत्पादक संकटात.. कोट्यवधींचा माल फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
हेही वाचा -कोरोनाला रोखण्यासाठी 'बारामती पॅटर्न'चा आधार, कोव्हिड-१९ आरोग्य केंद्र सुरू