पुणे - पवित्र इंद्रायणी नदीला मागील काही काळापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषणाने विळखा घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीमध्ये फेसाळलेले पाणी येत होते. मात्र, मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आता केमिकलयुक्त पाणी हे पूर्णपणे वाहून गेले असून आज इंद्रायणीतून शुद्ध पाणी वाहू लागले आहे.
पवित्र अशी इंद्रायणी नदी नागमोडी वळणं घेऊन पिंपरी-चिंचवड सह औद्योगिक वसाहतीतुन देवाच्या देहु व आळंदीतून वाहत जाते. शहरीकरणासह औद्योगिक नगरीतील दुरगंधीयुक्त पाणी थेट इंद्रायणीच्या पात्रात सोडलं जाते. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन इंद्रायणीचे पात्र गटारगंगा बनत चालले आहे. याला आपणच जबाबदार असताना त्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसाने इंद्रायणीचे पात्र स्वच्छ केले असून त्यामुळे आता ही इंद्रायणी स्वच्छ पाण्याने खळखळ वाहत आहे.
अर्जुन मेदनकर इंद्रायणी नदीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना
काही दिवसापूर्वी इंद्रायणीच्या नदी पात्रात केमिकलयुक्त पाण्यामुळे मोठ्याप्रमाणात मासे मृत झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे, नागरिक भयभीत झाले होते. तर याच नदीतुन अनेक गावांना, शहरांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो.
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी आणि देहू नगरी मधून ही इंद्रायणी नदी आपले मार्गक्रमण करत जात असते. मात्र श्री क्षेत्र देहू नगरी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दी मधून इंद्रायणीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिका असेल किंवा देहूगावं या शहराचे सांडपाणी हे थेट सोडले जाते. यामुळे इंद्रायणी नदी ही प्रदूषित झाली आहे. मात्र सध्या झालेल्या पावसामुळे नदीतील प्रदूषित पाणी वाहून गेल्याने इंद्रायणी स्वच्छ पाण्यासह आणि खळखळून वाहत आहे.