पुणे- चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करणाऱ्या दोघांना पुणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. महेश जंगलु मने (वय 40, रा. सणसर, इंदापूर, पुणे) आणि दत्तात्रय पोपट पवार (वय 42, रा. बोरी, इंदापूर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 9 बोरची रायफल, 6 जिवंत काडतुसे आणि 1 वापरलेले काडतूस जप्त करण्यात आले आहे.
सापडले चिंकारा जातीचे मृत हरीण
इंदापूर वनपरिक्षेत्रातील कळस, काझड, शिवेवर वनविभागाचे कर्मचारी मंगळवारी रात्री गस्त घालत असताना त्यांना जंगलातून बॅटरीचा प्रकाश दिसला. यानंतर कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी जंगलात पाठलाग करून वरील दोघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या एका बोरीमध्ये रक्ताने माखलेले चिंकारा जातीचे हरीण मृतावस्थेत सापडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हरणाची शिकार केल्याचे सांगितले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या ताब्यात 9 बोरची रायफल, 6 जिवंत काडतुसे आणि 1 वापरलेले काडतूस, एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या विरोधात भारतीय वन अधिनियम 1927चे कलम 26(1), (ड) (1) व वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चे कलम 2(16), 9, 11 व 5 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक आशुतोष शेडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल जंक्शन अशोक नरुटे आणि वनरक्षक पूजा काटे यांच्या पथकाने केली.
हेही वाचा -'मराठा आरक्षण लढ्याची ठिणगी कोल्हापुरातून पेटली पाहिजे'