पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील पूर्णानगर येथे दुकानांना भीषण आग लागली आहे. आगीच्या या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. चिमणराव देवराम चौधरी ( वय 41) नम्रता चिमणराव चौधरी ( वय 38 ) , भावेश चिमणराव चौधरी ( वय 15 ) आणि सचिन चिमणराव चौधरी ( वय 13 ) अशी मृतांची नावं आहेत. ही घटना बुधवारी पहाटे घडली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालेला असून ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.सध्या चारही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल.- महापालिका आयुक्त शेखर सिंह
बुधवारी पहाटे लागली दुकानाला आग :याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूर्णानगर चिंचवड इथं बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला आग लागली. दुकानात इलेक्ट्रॉनिक सामान असल्यामुळे आगीनं काही वेळेत रौद्ररूप धारण केलं. ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये देखील पसरली. शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
एकाच कुटुंबतील चौघांचा होरपळून मृत्यू :पहाटेच्या सुमारास दुकानाला आग लागल्यानं एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत पती, पत्नी आणि दोन बालकांचा समावेश आहे. चिमणराव देवराम चौधरी ( वय 41 ) , नम्रता चिमणराव चौधरी ( वय 38 ) , भावेश चिमणराव चौधरी ( वय 15 ) आणि सचिन चिमणराव चौधरी ( वय 13 ) यांचा या आगीत मृत्यू झाला आहे.
चार मृतदेह काढले बाहेर :आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. अग्निशमन विभागाच्या जवानांनी चार मृतदेह बाहेर काढले आहेत. घटनास्थळी सध्या कुलींगचं काम सुरू आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या आगीत आणखी काही जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आग लागली त्यावेळी परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानं ही घटना समोर आली आहे.
महापालिका आयुक्तांची घटनास्थळी भेट :अचानक लागलेल्या आगीनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिखली पोलीस आणि अग्निशमन दलाकडून कारवाई करण्याचं काम सुरू आहे. या घटनेनं परिसरात गर्दी झाली असून दुकानातील मालाचं यात मोठं नुकसान झालं आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त, स्थानिक पोलीस प्रशासनासह अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झालेला असून ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचं महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं आहे. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. तसेच सध्या चारही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Pune Fire News: येवलेवाडीत गोडाऊनमधे लागली भीषण आग; फॅब्रिक मटेरियलने घेतला पेट