पुणे - शहरामध्ये हॉटेल व्यावसायिकांना रात्री दहापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. हॉटेल व्यवसाय सुरळीत करण्याचे सरकारचे प्रयत्न असताना इतर दुकानांना मात्र, अजूनही सायंकाळी 7 पर्यंतचे बंधन कायम आहे. या दुकानांना देखील रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी होत आहे. या संदर्भात पुणे व्यापारी महासंघाने प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाही एक पत्र दिले आहे.
हॉटेलप्रमाणे इतर दुकानांनाही रात्री दहापर्यंत परवानगी द्या; व्यापारी महासंघाची मागणी - पुणे व्यापारी महासंघ मागणी न्यूज
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गेले काही महिने हॉटेल व दुकाने बंद होती. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर पुण्यात हॉटेल चालकांना रात्री ११पर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, इतर दुकानांवर वेळेचे बंधन कायम आहेत.
कोरोना संकटात व्यापारी महासंघाने इमानेइतबारे दुकाने बंद ठेवून नियमांचे पालन केले. मात्र, आता बंधने शिथिल करण्याची वेळ आली तर हॉटेल आणि इतर दुकानांमध्ये फरक का? असा प्रश्न व्यापारी महासंघाने उपस्थित केला आहे. सध्या अधिक मास सुरू आहे. अधिक मासाला हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे. या काळात मोठ्या संख्येने नागरिक खरेदी करत असतात. मात्र, वेळेच्या निर्बंधामुळे नागरिकांना खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. सध्याचा अधिक मास व पुढे येणारा दसरा-दिवाळी या सणांमुळे बाजारात खरेदीची रेलचेल असते. अशा परिस्थितीमध्ये सायंकाळी सातपर्यंत वेळेचे बंधन हे दुकानदारांसाठी फायद्याचे नाही. त्यामुळे सरकारने याबाबत विचार करून दुकानदारांना देखील रात्री दहापर्यंतची वेळ द्यावी, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी केली.