पुणे -केंद्र सरकारने नव्याने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली. पुणे जिल्ह्यात सकाळच्या सत्रात या भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. भारत बंदचा सर्वात जास्त परिणाम पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री होणारे प्रमुख ठिकाण म्हणून पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाहिले जाते. या कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज नऊशे ते हजार ट्रकमधून फळे आणि भाज्यांची आवक होते. परंतु आज पहाटेपासून या बाजार समिती केवळ दीडशे ते दोनशे ट्रकची आवक झाली आहे. हे ट्रक सुद्धा इतर राज्यातून आलेले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ 15 टक्के मालाची आवक झाली फक्त बाहेरच्या राज्यातील माल उतरून घेतला -
या मार्केटमध्ये आज पहाटेच्या सुमारास काही तुरळक दुकाने उघडी होती. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवस व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. त्यामुळे पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शुकशुकाट पहायला मिळत आहे. जो माल बाहेरच्या राज्यातून आला आहे तो खराब होऊ नये म्हणून गाड्यांमधून उतरवण्यात आला आहे. त्याचे लिलाव आणि विक्री झालेली नाही, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
इतर व्यापाऱ्यांचाही प्रतिसाद -
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही आज बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पुण्यातील इतर व्यापाऱ्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत दुपारी साडेबारापर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दुपारी साडेबारा नंतर व्यापारी आपली दुकाने सुरू ठेवणार आहेत. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांनी ही माहिती दिली आहे.
महाविकास आघाडी काढणार मोर्चा -
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी हे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी वारजेतील महामार्गावर एकत्र जमणार आहेत. तर, महाविकास आघाडी आणि पुरोगामी पक्षांच्यावतीने पुण्यातील अलका चौकातून भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहारही बंद -
या संपात एपीएमसीच्या सर्व बाजारपेठा सहभागी होणार आहे. आज संपूर्ण बाजार बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. बाजार समित्यांच्या आवारात व्यापारी व्यापार करतात, माथाडी कामगार कष्टाचे काम करतात. केंद्र सरकारने केलेल्या कृषी व पणन कायद्यातील बदल व नवीन कायद्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा येणार आहे, तसेच माथाडी कामगारांचा रोजगारही हिरावला जाणार आहे. या कायद्यामुळे सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तुर्भे येथील एपीएमसीच्या पाचही बाजारपेठांतील कामकाज मंगळवारी पूर्णत: बंद राहणार आहेत. त्यामुळे बाजार समितीतील व्यापारी, माथाडी कामगार, शेतकरी आणि इतर घटक बंदमध्ये सहभागी झाले आहेत.