पुणे : राज्य सरकारकडून 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या. यामुळे विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात टीका होत होती. यासोबतच गुणवत्तेचाही प्रश्न निर्माण झाला होता. परंतु यावर आता पुणे जिल्हा परिषदेने ( Pune Zilla Parishad ) एक पर्याय दिलेला आहे. विद्यार्थी-शिक्षक आणि गुणवत्ता यात कुठेही तडजोड न करता या शाळा सुरू होऊ शकतात, असा प्रयोग पुणे जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ( Pune ZP CEO Ayush Prasad ) यांनी दिलेली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचा प्रयोग :20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याला पुणे जिल्हा परिषदेने अभिनव प्रयोग राबवून पर्याय दिला आहे. वेल्हे तालुक्यातील 16 गावांच्या 16 शाळा एकत्र करण्याचा हा पर्याय आहे .पानशेतमध्ये एक मोठी इमारत उभारली असून लवकरच येथे शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्त मुलांसोबत शिक्षण घेण्याबरोबर, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी देखील मदत होईल, अशी जिल्हा परिषदेला अपेक्षा आहे.
शाळा एकत्रीकरण : विद्यार्थी संख्या कमी असल्याने 2 शिक्षकांच्यासह शाळा चालवले जाते. परिणामी एकाच वर्ग खोलीत विविध वर्गातील विद्यार्थी एकत्र बसून शिक्षण घेत आहेत. पानशेतमध्ये मात्र प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच वर्गातील विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेता येणार आहे. याशिवाय कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये समूह शिक्षणाचा असलेला फायदा होत नव्हता. तो आता होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. शाळा एकत्रित करण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग पानशेतमध्ये राबवला जात आहे.
असा राबविला जाणार प्रयोग : 16 शाळांची सीएसआरच्या मदतीने मोठ्या अद्यावत अशा इमारतीमध्ये एक शाळा पुढील काही दिवसात सुरू होत आहे. जिल्ह्यातील सुमारे 2964 शाळांमध्ये एक ते पाच वर्गामध्ये 60 पेक्षा कमी विद्यार्थी असून त्यांना केवळ दोन शिक्षकाकडून शिकवले जाते .सध्या या 16 शाळांमध्ये 37 शिक्षक कार्यरत आहेत. शाळा एकत्रित करण्यातून केवळ 9 शिक्षकांची गरज भासणार आहे. मात्र विषय तज्ञ म्हणून येथे 12 शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना सुविधा:विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी दोन बस असतील त्यासाठी फोर्स मोटर्सने दोन बस दिले आहेत. त्यातील एक बस जिल्हा परिषदेच्या मालकीची असेल. एक बस स्थानिक चालकांना देण्यात येणार आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापावे लागत असल्यास ,अशा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून वर्षाकाठी 6 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. हे प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जाणार आहे. या नव्या शाळेमध्ये पहिली ते आठवीसाठी वर्ग खोल्या आहेत. त्याचबरोबर संगणक विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम प्रयोगशाळा वैयक्तिक क्लास रूम करण्यात आलेली आहे. एक खोली सध्या मोकळी ठेवण्यात आली आहे. एकूण 12 वर्ग खोल्यांची शाळा आहे.
विरोध नंतर होकार : शाळा एकत्रीकरणाला सुरुवातीला पालकांसह शिक्षकांचा विरोध होता. परंतु त्याचे फायदे सांगितल्यावर त्याने होकार दिला. त्यानुसार पानशेत गावात बारा वर्ग खोल्याची शाळा उभारण्याचे ठरले. पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जागेवर नवीन शाळा इमारत बांधण्यात आली. त्याला जानकीदेवी बजाज फाउंडेशनने सव्वा कोटी रुपयांची सामाजिक दायित्व निधीतून मदत केली. सध्याच्या सुट्ट्यानंतर 16 शाळांमधील 154 विद्यार्थी पानशेत च्या नव्या शाळेत दाखल होणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेली आहे.