पुणे - पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला बालेवाडी क्रीडा संकुल येथे सुरुवात झाली. या मतमोजणीच्या निमित्ताने बालेवाडी क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल चेकिंग तसेच सॅनिटायझरचा वापर करण्यात येतो आहे. मतमोजणी केंद्राच्या आत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल चेकिंग आणि सॅनिटायझर देऊनच प्रवेश दिला जातोय.
भरघोस मतदान झाल्याने चुरस वाढली आहे. पदवीधर मतदारसंघासाठी 57 टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी तब्बल 73 टक्के मतदान झाल्याने मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कोणाला होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी 112 टेबल तर शिक्षक मतदारसंघासाठी 42 टेबल लावण्यात आले आहेत.
पुणे विभागातील पाच जिल्ह्यातून आलेल्या मतपेट्या सुरुवातीला एकत्र करण्यात आल्या. त्यानंतर वैध आणि अवैध मते बाजूला करण्यात आली. वैध मतांमधून पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे निकाल घोषित होण्यास 36 तास लागू शकतात, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.