पुणे :शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाचे उपनेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुणे जिल्ह्यात सासवड पुरंदर या भागांमध्ये यांचे कार्यकर्त्यांमधली संघटन हे चांगलं असल्यामुळे त्या भागात त्यांचे बरेच प्राबल्य आहे त्यामुळे पुण्यातील ग्रामीण भागामध्ये शिंदे गटाला याचा फायदा होऊ शकतो आणि ठाकरे गटाला याचा खूप मोठा नुकसानाला होणार असल्याचे बोलले जात आहे.
'या' कारणामुळे पक्षाचा राजीनामा दिला :पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत कुठेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे गटाला एकही जागा दिली नाही. याउलट त्यांचे फोटो वापरून महाविकास आघाडीच्या नावाने निवडणुका लढवल्या. या निवडणुकांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकही जागा आपल्याला देण्यात आलेली नसताना, पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचाराला येत होते. उद्धव ठाकरे गटाचे खच्चीकरण करून काँग्रेस राष्ट्रवादीला बळ देण्याच्या या प्रकारामुळे व्यथित होऊन त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
उद्धव ठाकरे गटाची म्हणावी तशी ताकद नाही :पुणे जिल्ह्यात पुणे शहरात महानगरपालिकेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे गटाची म्हणावी तशी ताकद नाही. सत्तांतरानंतर ठाकरे गटाने मोठ्या नेत्यांची फळी पुण्यात कामासाठी लावले. त्यामध्ये आदित्य शिरोडकर असतील आमदार सचिन आहेर असतील हे सातत्याने पुणे जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी पक्ष वाढवण्यासाठी बैठका घेत आहेत. परंतु या नेत्यांना कार्यकर्त्यांना थांबवता येत नसल्याचे चित्र पुण्यात वारंवार दिसत आहे. महाविकास आघाडीत मतभेद नाहीत असे म्हटले तर स्थानिक स्तरावर मात्र त्याचा परिणाम दिसत आहे.