पुणे Pune District Bank Election : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. अजित पवार यांच्या या रिक्त झालेल्या संचालक पदाच्या जागेवर पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत अजित पवार यांचे विश्वासू रणजित तावरे यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला होता राजीनामा :अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप आणि राज्यातील पक्ष संघटनेची जबाबदारी यामुळे अपुरा वेळ मिळत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. अजित पवार हे बारामती तालुका 'अ' वर्ग मतदार संघातून बँकेवर गेली 32 वर्षापासून प्रतिनिधीत्व करत होते. मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानं संचालक पद रिक्त झालं होतं.
पार्थ पवार राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर बारामती लोकसभेच्या दृष्टीनं मुलगा पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार हे संचालक पदासाठी अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात होतं. बँकेचे संचालक होऊन जिल्ह्याच्या राजकारणात पार्थ पवार एन्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. पण आत्ता या सर्व राजकीय शक्यतांना पूर्ण विराम मिळाला आहे. बुधवारी बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक पार पडली. यात रणजित तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रणजित तावरे हे बाळासाहेब तावरे यांचे पुतणे असून ते अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू असल्याचं बोललं जाते.