पुणे -जिल्ह्यात अंगणवाड्यांमधील बालकांच्या पोषण आहारावर लाखो रुपये खर्च करूनही जिल्ह्यात पाच वर्षे वयापर्यंतची १,६०३ बालके मध्यम कमी वजनाची आढळली आहेत, (Malnourishment in pune) तर २५३ बालके तीव्र कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्टमध्ये महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागाने कुपोषित बालक शोध व आरोग्य तपासणी मोहीम राबवली असता (Survey of malnourished children) ही बाब समोर आली आहे.
कोरोना काळात माता आणि बालकांची नियमित आरोग्य तपासणी झाली नाही -
जुन्नर तालुक्यात सर्वाधिक ३४ तीव्र कुपोषित बालकांची संख्या आहे. खेड मध्ये २४ तीव्र कुपोषित बालके आहेत. कोरोना काळात माता आणि बालकांची नियमित आरोग्य तपासणी झाली नाही. तसेच गरोदर माता आणि बालकांना पोषक आहारही मिळाला नाही. त्यामुळे आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत होती. १५ ते ३१ ऑगस्ट २०२१ दरम्यान जिल्ह्यात धडक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. (Survey of malnourished children) त्यामध्ये ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील एकूण ३ लाख १४ हजार ४८ बालक संख्या आहे. त्यातील २ लाख ९८ हजार ४४८ सर्वसाधारण बालके असून, या सर्वेक्षणात १ हजार ६०३ बालके मध्यम कुपोषित आढळून आली तर २५३ तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत.
घरपोच आहाराची व्यवस्था -
अतिकुपोषित असलेल्या मुलांवर स्थानिक ग्रामपंचायतींचे विशेष लक्ष असून दररोज अंगणवाडी सेविका त्या मुलांना दिल्या जाणाऱ्या आहाराची माहिती घरी जाऊन घेत आहेत. मध्यम आणि तीव स्वरूपाच्या कुपोषित मुलांना 60 दिवसांचा पोषण आहार पुरवण्यात आला आहे. मुलांना कशा पद्धतीने आहार दिला पाहिजे, याची संपूर्ण माहिती पालकांना देण्यात आली असून त्या मुलांमध्ये सुधारणा होत असल्याचा दावा महिला व बालविकास विभागाने केला आहे.
मुलांच्या आरोग्याची माहिती सॉफ्टवेअरद्वारे संकलित -
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमअंतर्गत जिल्ह्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य तपासणी मोहिमेच्या माध्यमातून जिल्हातील कुपोषित मुलांचा शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर आजारी मुलांचाही शोध घेतला जात आहे. मुलांच्या आरोग्याची माहिती सॉफ्टवेअरद्वारे संकलित केली जात असून, ही माहिती भविष्यात मुलांवर उपचार करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण अधिकारी जे. बी. गिरासे यांनी दिली.