पुणे -कोरोनाच्या महासंकटात अनेक उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक यात्रा, सण व उत्सव रद्द करण्यात आले आहेत. पुण्याची शान असलेला गणेशोत्सवही यंदा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. जसा पुण्याचा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे, तसेच ढोल-ताशा वादनही पुण्याची ओळख आहे. मात्र, यंदा सार्वजनिक गणेशमंडळांनी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतल्याने गणेशोत्सवात ढोल-ताशांचे वादन होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
साधारणत: गणेशोत्सवाच्या दोन ते तीन महिने अगोदर पुण्यातील विविध ठिकाणी ढोल-ताशा पथके आपापला सराव करत असतात. यंदा पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ढोल-ताशा पथकांची तयारी बंद आहे. मनुष्याचे आरोग्य हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. पुण्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत ढोल- ताशा पथकांच्या सरावाला सुरुवात होण्याची शक्यता नाही. ढोल-ताशा पथकांची भूमिका ही नेहेमी गणेश मंडळांना पूरक असते. प्रशासन, पोलीस आणि पुणे महानगरपालिका जो निर्णय घेतील, तो निर्णय पथकांना मान्य करावा लागेल, असे ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी सांगितले.