पुणे -शिक्षणाचे माहेरघर तसेच सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. पुणे शहरात रोज साधारणत: 20 ते 25 सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. मात्र, संचारबंदीमुळे एकही सांस्कृतिक कार्यक्रम झालेला नाही. पुढील 6 महिने तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कार्यक्रम होणार नाही, अशी चिंता आयोजकांनी व्यक्त केली आहे.
पुणे शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. पुरस्कार, संगीत, पुस्तक प्रकाशन, नाटक असे वेगवेगळे कार्यक्रम होतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रांवर याचा परिणाम झाला आहे. मात्र, काही क्षेत्र लॉकडाऊननंतर हळूहळू वर येतीलही पण सांस्कृतिक कार्यक्रम पुढील 6 महिनेतरी होणार नाही असे चित्र सध्यातरी दिसत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून घेण्यात आलेले निर्णय योग्यच आहे. गेल्या 28 वर्षापासून मी सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून शहरात एकही सांस्कृतिक कार्यक्रम झालेला नाही. याची खंत वाटते. मात्र, हा निर्णय योग्यच आहे. सांस्कृतिक कार्यक्रम लॉकडाऊननंतर पुढील 6 महिने तरी होणार नाही याची भीती निश्चितच वाटते. पुण्यात 400 ते 500 कार्यक्रम दर महिन्याला होत असतात. मात्र, जोपर्यंत कोरोना जात नाही, तोपर्यंत किंवा त्याच्या एक महिन्यानंतर तरी कार्यक्रम होणार नाही. कारण कार्यक्रम घ्यायला आयोजकही विचार करतील आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे रसिकही यायला टाळतील, अशी खंत रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर यांनी व्यक्त केली.
एप्रिलनंतरचा जो आमचा बालनाट्य, बालचित्रपट कार्यक्रम होत असतात त्याचा मोठा फटका आम्हाला बसला आहे. कोरोनामुळे ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत तरी याच्यात काही सुधारणा होईल असे वाटत नाही. कोरोनाच्या पाश्वभूमीवर गर्दी करण्यास शासनाकडून रोखण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना तर हजारोच्या संख्येने गर्दी होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊननंतर ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. अशी माहिती अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली