पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी आहे, असे असतानाच आता एका तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता काढल्याची घटना पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शनिवारी घडली. या घटनेची पोलिसांनी तात्काळ गांभीर्याने दखल घेत त्या तरुणाला अटक केली आहे. तसेच या तरुणाला चाप बसाव म्हणून पोलिसांनी आरोपीची त्याच कॉलेजमधून धिंड काढली आहे. कुणाल कानगुडे (१९) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे.
कॉलेजमध्ये कोयता काढून दहशत :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कुणालचे आबासाहेब गरवारे महाविद्यालयात डॅनी या तरुणाशी काही वाद झाले होते. त्यानंतर कॉलेजमध्ये दहशत राहावी, तसेच काही भांडणाच्या कारणामुळे त्याने थेट कॉलेजमध्ये कोयता काढून दहशत माजवली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कॉलेजमधील सीसीटीव्ही तपासून त्याला अटक करून डेक्कन परिसर तसेच कॉलेजमध्ये त्याची धिंड काढली आहे.
पती पत्नीच्या वादात कोयत्याने हल्ला : कोयता विक्रीवरून पती पत्नीत झालेल्या वादात दोघांनीही एकमेकांवर वार केल्याची घटना घडली आहे. या कोयता हल्ल्यात दोघेही नवरा बायको जखमी झाले आहे. दोघांनीही पोलिसांकडे एकमेकांविरुद्ध तक्रारी केली आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार मार्केटयार्ड येथील एका सोसायटीत २९ जून रोजी दुपारी दीड वाजता घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
कोयता विक्रीवरून वाद : याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी पती पत्नी हे 7 वर्षाच्या मुलासह पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात राहतात. पतीचे नवी पेठेत हे सलूनचे दुकान आहे. ते रहात असलेल्या घरात चार दिवसांपूर्वी एक कुलकर्णी या नावाचे व्यक्ती आले. त्यांनी झाडे कापण्यासाठी कोयता किंवा कैची विकत मागितली. पण पतीने ती विकण्यास नकार दिला. पत्नीला घरात कोयता दिसल्याने तिने कोयता विकून टाका, असे सांगितले. त्यावर पतीने कोणी कोयत्याचा गैरवापर केल्यास आपणास त्रास होईल असे सांगितले. त्यावर दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा वाढला की, पतीने हातातील कोयता पत्नीला मारला. पतीला खाली पाडून पत्नीने हाताने व लाथेने मारहाण केली असे पतीने फिर्यादीत म्हटले आहे.