पुणे Pune Crime News : पिंपरी चिंचवडच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं रुग्णवाहिकेमधून गांजा विक्री करणाऱ्या आरोपींना गजाआड केलं आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून 1 कोटी 31 लाखांचा तब्बल 96 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन रुग्णवाहिका, चार मोबाईल आणि एक कार जप्त करण्यात आली आहे. कृष्णा मारुती शिंदे, अक्षय बारकू मोरे, हनुमंत भाऊसाहेब कदम, देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डूकळे, सनीदेवल सिद्धार्थ शर्मा, सनीदेवल भगवानदास भारती आणि सौरव निर्मल या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात रुग्णवाहिकेतून सौरव निर्मल यास गांजा विक्री करणार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रुग्णवाहिकेतून तस्करी होणारा गांजा :अमली पदार्थ विरोधी पथकाचे सदानंद रुद्राक्षे आणि रणधीर माने यांना खबऱ्यानं माहिती दिली होती. त्या माहितीवरुन अमली पदार्थ विरोधी पथकानं रावेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत म्हस्के वस्ती इथं कृष्णा मारुती शिंदे (वय 27 वर्षे, रा. शिंदेवस्ती, शितपूर, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अक्षय बारकु मोरे (वय 29 वर्षे, रा. कान्होबा वस्ती, पाटेगाव, ता. कर्जत जि. अहमदनगर), हनुमंत भाऊसाहेब कदम (वय 35 वर्षे, रा. कुसडगाव, एस.आर.पी.एफ. सेंटर जवळ, ता. जामखेड, जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडं 30 लाख 55 हजार 700 रूपये किंमातीचा गांजा पकडण्यात आला. त्यामध्ये 25 लाख 69 हजार 100 रुपये किंमतीचा 25 किलो 691 ग्रॅम गांजा, एक सफेद रंगाची शेवरे कार क्रमांक एमएच 14 सीडब्ल्यु 0007, 04 मोबाईल आणि 1 हाजर 600 रुपये रोख रक्कम असा माल जप्त केला. त्यांनी हा गांजा देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे (वय 32 वर्षे रा. उंडेगाव ता. परांडा, जि. धाराशिव) यांच्याकडून आणल्याची माहिती दिली. हा गांजा ते सौरव निर्मल याला विकणार असल्याचं त्यांनी सांगितल्यानं त्यांच्याविरुध्द रावेत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रुग्णावाहिका जप्त :या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी आरोपी देवी प्रसाद उर्फ देवा सिताराम डुकळे याला तांत्रिक विश्लेषणावरुन उंडेगाव धाराशिव येथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडं 50 लाख 20 हजारांचा 50 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. हा गांजा ते सौरव निर्मल (रा. रुपीनगर, चिखली, पुणे) याला विकण्यासाठी आणल्यानं आणि आरोपी रुग्णवाहिकेमधून गांजा वाहतूक करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेवून त्याच्याकडं असलेल्या दोन रुग्णवाहिका जप्त करण्यात आल्या.