पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झालीय. शहरात गुन्हेगारीच्या संदर्भात वेगवेगळे प्रकार घडत आहे. अशातच पतीनं केवळ तीन हजार रुपयांसाठी पत्नीला वेश्याव्यवसायात उतरवल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसर परिसरात घडलीय. पीडित महिलेचा पती भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यासह दोनजणांना अटक केलीय. या प्रकरणी 25 वर्षांच्या पीडितेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पैशाच्या लालसेपोटी पत्नीला वेश्याव्यवसायात उतरवले :याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिलेला तिचा पती लग्न झाल्यापासून सातत्यानं त्रास देत आहे. आता तर त्याने मर्यादा ओलांडत पैशाच्या लालसेपोटी पत्नीला मारहाण केली. तिला जबरदस्तीनं वेश्याव्यवसायासाठी उंड्री हांडेवाडी या रस्त्यावर उभं केलं होतं. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. संबंधित पीडित महिलेला वारंवार पतीकडून मारहाण होत होती. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर नराधम पतीनं त्याच्या दोन मित्रांनाच ग्राहक बनवले. मित्रांकडून प्रत्येकी तीन हजार रुपये घेतले. त्याच्या पत्नीला त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास बळजबरी केली होती. त्याच्या दोन्ही मित्रांनी तिच्यासोबत इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर ते दोघेही पीडितेला त्रास देत होते.