पुणे (पिंपरी चिंचवड) : शहरात एका गुन्हेगाराची त्याच्याच मित्रांनी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सागर सर्जेराव शिंदे (रा. मधुबन सोसायटी, जुनी सांगवी) असे मयत तरुण गुन्हेगारचे नाव आहे. फिल्मी थरारानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मारेकऱ्यांना अवघ्या दोन तासात अटक केली आहे. एकाच कारमधून प्रवास करत असताना सागर आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघांनी त्यांच्या मित्राला पिस्तुलातून गोळी झाडत ठार मारले. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार भिशीच्या पैशांच्या वादातून झाला असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
भिशीवरून झाला वाद आणि गोळीबार : पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी साडे पाच वाजेच्या सुमारास मयत सागर शिंदे आणि आरोपी एकाच कारमधून सांगवी परिसरातील औंध- रावेत बीआरटी मार्गावर असलेल्या रक्षक चौकाजवळ आले. गाडीमध्येच सागर आणि आरोपी योगेश जगताप यांच्यात भिशीच्या पैशाच्या देवाण घेवाणीवरून वाद सुरू झाला. त्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपी योगेश जगतातने बंदूक काढून सागरवर पहिली गोळी झाडली. पहिली गोळी लागल्यानंतर जीव वाचविण्यासाठी सागर गाडी बाहेर निघून पळू लागला, मात्र तेवढ्यात योजेश जगतापने सागरच्या पाठीत दुसरी गोळी झाडली. त्यात सागरचा घटनास्थळावर मृत्यू झाला.
घटनास्थळी गोळ्यांच्या दोन पुंगळ्या : रक्षक चौकातील भारत इलेक्ट्रिक कंपनीसमोर हा संपूर्ण प्रकार घडला. त्यानंतर आरोपी योगेश जगताप आपल्या सहकाऱ्यासोबत गाडीतून खाली उतरला. त्यांनी चौकात जाऊन एका दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवत अडवून त्याची दुचाकी घेऊन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता. घटनास्थळी पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या गोळ्यांच्या दोन पुंगळ्या मिळालेल्या आहेत. गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांच्या पथकाने गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपी योगेश जगतापला ताब्यात घेतले.