पुणे - पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरवर एका व्यक्तीला महिलांच्या नकाराचा देखील सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. पुणे पोलिसांनी '#LetsTalkCPPuneCity' हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमात पोलीस आयुक्त नागरिकांच्या प्रश्नांना आणि समस्यांना उत्तर देतात.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे ट्विट काय आहे प्रकरण -
सोमवारी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासाठी एका व्यक्तीने, 'माझ्या मैत्रीणाला माझे प्रपोज स्वीकारण्यास सांगा. त्यासाठी मला मदत करा', असे ट्विट केले होते. त्याला पोलीस आयुक्तांनी अतिशय समर्पक असे उत्तर दिले आहे.
पोलीस आयुक्तांनी दिले समर्पक उत्तर -
तिच्या इच्छे विरुद्ध आपण काहीही करू शकत नाही. आपण तसे करणे चुकीचेच आहे. जर तीने तुम्हाला होकार दिलाच तर पुणे पोलिसांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद तुमच्या सोबत आहेत. महिलांचा नकार हा नकारच असतो, हे आपण सर्वांनी मान्य केले पाहिजे, असे ट्विट अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.
अमिताभ गुप्ता यांनी महिला सुरक्षा, रस्ते सुरक्षा, पोलीस आणि नागरिकांचे एकमेकांसोबतचे वर्तन याविविध विषयांवर नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. अमिताभ गुप्ता हे २० सप्टेंबर २०२०पासून पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत. डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडून गुप्ता यांनी पदभार स्वीकारला होता.