पुणे -कोणताही गुन्हा घडल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी सर्वाधिक मदत होते, ती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची. पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीचे स्वरूप पाहता शहरात सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विस्तार केला जात आहे. सद्यस्थितीत पुणे शहरातील प्रमुख चौकात 1000 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पुणे शहराची सध्याची लोकसंख्या पाहता कॅमेर्यांचीही संख्या तुटपुंजी आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आणखी 1400 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात येईल -
सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांची नजर असणारे पुणे शहर हे राज्यातील पहिले शहर ठरले होते. 2014 खाली शहरात हजारहून अधिक कॅमेरे बसविण्यात आले होते. परंतु शहराचा वाढता विस्तार पाहता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची ही संख्या अपुरी पडत होती. पुणे पोलीस आयुक्तालयात आता नव्याने 6 पोलीस ठाण्यांची निर्मिती होणार आहे. हे सर्व पाहता आता शहरातील प्रत्येक चौकात गल्लीत आणि रस्त्यावर सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. शहरात नव्याने चौदाशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.