पुणे- दिवसाला सरासरी दहा लाख प्रवासी आणि दीड कोटी रुपये उत्पन्न मिळविणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला लॉकडाऊनच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या महिनाभरात प्रतिदिन केवळ सव्वा लाखांचे उत्पन्न पदरी पडले असून दिवसाकाठी केवळ दहा हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाउनमुळे शाळा, कॉलेज, खासगी कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा मोठा फटका पीएमपीएलला बसला आहे. २० मार्च ते २२ एप्रिल या कालावधीत सुमारे तीन लाख प्रवाशांनी पीएमपीने प्रवास केल्याचे नोंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून पीएमपीला 35 लाखांपर्यंतचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.