पुणे- संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायांचे श्रद्धास्थान असणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचे बुधवारी सायंकाळी पुण्यात आगमन होणार आहे. या पालख्यासोबतच लाखोच्या संख्येने वारकरी पुणे शहरात येत असतात. त्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज झाली आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असते. तर संत तुकारामांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असते. या दोन्ही पालख्या विसावा घेणार असलेल्या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. पालखी शहरात मुक्कामी असताना दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी संशयितावर सीसीटीव्ही कॅमेऱयाद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.