पुणे- आजपासून नवरात्र उत्सवाला सुरवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात सर्व नियमांचे पालन करून महापूजा आणि घटस्थापना करण्यात आली. सकाळी 9 वाजता घटस्थापना झाली. तसेच शासनाच्या नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र ऑनलाइन पद्धतीने देवीच्या दर्शनाची सोय मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
चतु:श्रृंगी मंदिरात घटस्थापना.. दर्शनासाठी ऑनलाइन व्यवस्था
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चतु:श्रृंगी देवीच्या मंदिरात सर्व नियमांचे पालन करून महापूजा आणि घटस्थापना करण्यात आली. शासनाच्या नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र ऑनलाइन पद्धतीने देवीच्या दर्शनाची सोय मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. दररोज सकाळी 9 वाजता आणि रात्री 8.30 वाजता देवीची आरती करण्यात येणार आहे.
दररोज सकाळी 9 वाजता आणि रात्री 8.30 वाजता देवीची आरती करण्यात येणार आहे. भाविकांसाठी देवस्थानच्या फेसबुक पेजवर आणि युट्युबवर दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता व रंगरंगोटीची कामे पूर्ण करण्यात आली असून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने या वर्षीचे सर्व धार्मिक विधी केवळ कर्मचारी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. तसेच मंदिरातील सर्वांचा मेडिक्लेम, कोरोना कव्हर देण्यात आला आहे. मंदिरातील कर्मचारी, पुजारी यांना सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझर, मास्क आणि हातमोजांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.
यंदा नवरात्र उत्सव भाविकांविना साजरा होत असला तरी धार्मिक विधी आणि पारंपारिक पद्धतीने 9 दिवस विविध कार्यक्रम मंदिरात होणार आहे. भाविकांना यंदा ऑनलाइन पद्धतीने दर्शनाची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती मंदिराचे कार्यकारी विश्वस्त देवेंद्र अनगळ यांनी दिली आहे.