पुणे- राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा आहे. राज्य सरकारच्यावतीने राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. पुण्यातही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, आज (रविवारी) आयोजित करण्यात आलेल्या एका रक्तदान शिबिराची जास्तच चर्चा होत आहे. या शिबिरात मांसाहारी रक्तदात्याला एक किलो चिकन आणि शाकाहारी रक्तदात्याला अर्धा किलो पनीर देण्यात आले. यामुळे याच रक्तदान शिबिरात रक्तदात्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रक्तदान शिबिरात 300 किलो चिकन आणि 50 किलो पनीरचे वाटप -
कोथरूड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक बंडू केमसे यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला एक किलो चिकन आणि अर्धा किलो पनीर देण्यात आले. दुपारपर्यंत रक्तदान शिबिरात 300 किलो चिकन आणि 50 किलो पनीरचे वाटप रक्तदात्यांना करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक शंकर केमसे यांनी दिली.