आंबेगाव(पुणे) -उत्तर पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा वसंतदादा पाटील 'सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार' पाच वेळा मिळविणारा देशातील पहिला साखर ठरला आहे. या कारखान्याने आत्तापर्यंत देश व राज्य पातळीवरील एकूण 22 पुरस्कार प्राप्त केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
भीमाशंकर साखर कारखान्याची पुरस्कारासाठी सलग पाचव्यांदा निवड
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरी लि नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली येथे करण्यात आली. यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कारासाठी भीमाशंकर साखर कारखान्याची पाचव्यांदा निवड करण्यात आली असून गाळप हंगाम 2019-20 मध्ये भीमाशंकर साखर कारखान्याने साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे हा पुरस्कार देण्यात येत आहे.
दिलीप वळसे पाटलांची दूरदृष्टी
कामगार व उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या कारखान्याचे रोपटे लावले होते. ग्रामीण भागातील शेतकरी हा ऊसशेतीच्या माध्यमातून उभारी घेईल आणि स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल या हेतूने भीमाशंकर साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली होती. वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्यात ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, आर्थिक व्यवस्थापन, कर्ज परतफेड, व्याज खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, गुंतवणूक, वेळेत दिलेले ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचीत नफा, कारखान्याचे नक्त मूल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा व कारखान्याची उपलब्ध केलेला निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे अशा अनेक बाबींचा विचार करून नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरी लि नवी दिल्ली यांच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील १० व राज्य पातळीवरील १२ असे एकूण २२ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. देशातील 'सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना' पुरस्कार पाच वेळा मिळविणारा देशातील पहिला साखर कारखाना आहे, असेही बेंडे यांनी सांगितले.